दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात ऑनलाईन तृतीय वर्ष विज्ञान इलेक्ट्रॉनिक्स अभ्यासक्रम पुनर्रचना कार्यशाळा संपन्न
चोपडा : येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयातील इलेक्ट्रॉनिक्स विभागातर्फे ऑनलाईन “तृतीय वर्ष विज्ञान इलेक्ट्रॉनिक्स (NEP-2020) अभ्यासक्रम पुनर्रचना कार्यशाळेचे आयोजन दि. ८ मे २०२६ रोजी करण्यात आले. ही कार्यशाळा क.ब.चौ. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथील Electronics & Instrumentation अभ्यास मंडळाच्या सहकार्याने संपन्न झाली.
या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ . संध्या एम. सोनवणे ह्या उपस्थित होत्या.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० अनुषंगाने विद्यार्थी-केंद्रित, कौशल्याधारित व उद्योगाभिमुख अभ्यासक्रम तयार करण्याच्या उद्देशाने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेमध्ये Artificial Intelligence, IoT, Advanced Communication Systems यांसारख्या आधुनिक व उदयोन्मुख तंत्रज्ञानांचा अभ्यासक्रमामध्ये समावेश करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
कार्यशाळेच्या प्रास्ताविकामध्ये इलेक्ट्रॉनिक्स विभागप्रमुख डॉ. कुणाल गायकवाड यांनी महाविद्यालयास NAAC मध्ये प्राप्त A+ मानांकन तसेच क.ब.चौ. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या शैक्षणिक लेखापरीक्षणामध्ये तीन जिल्ह्यांमध्ये प्राप्त A+ श्रेणीबद्दल माहिती देत, उद्योगाभिमुख व भविष्यकालीन गरजांनुसार अभ्यासक्रम तयार करण्याची आवश्यकता अधोरेखित केली.
महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रा. डॉ. संध्या एम. सोनवणे यांनी मार्गदर्शन करताना रोजगाराभिमुख व व्यावहारिक शिक्षणावर भर देणाऱ्या अभ्यासक्रमाची गरज व्यक्त केली. तसेच अभ्यास मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य प्रा. डॉ. आर. बी. वाघुळदे यांनी अभ्यासक्रम रचना, शैक्षणिक गुणवत्ता आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासंदर्भात मोलाचे मार्गदर्शन केले.
या कार्यशाळेत विविध महाविद्यालयांतील प्राध्यापक व विषयतज्ज्ञांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून अभ्यासक्रम अधिक परिणामकारक व भविष्याभिमुख करण्यासाठी मौल्यवान सूचना मांडल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन डॉ. एल. बी. पाटील यांनी केले. कार्यशाळेचे आयोजन इलेक्ट्रॉनिक्स विभागामार्फत करण्यात आले होते. या कार्यक्रमाप्रसंगी विद्यापीठ परिक्षेत्रातील विविध महाविद्यालयांतील प्राध्यापक बंधू भगिनी ऑनलाइन उपस्थित होते.

















