पिंपळगाव रेणुकाई येथे मका खरेदीत व्यापाऱ्यांची लूट; शेतकऱ्यांचा संताप उफाळला
भोकरदन (प्रतिनिधी):
तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई येथे सुरू असलेल्या मका हंगामात व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची सर्रास लूट होत असल्याचा आरोप समोर आला आहे. यामुळे परिसरातील शेतकरी संतप्त झाले असून प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणी होत आहे.
शेतकरी प्रतिनिधी कृष्णा बेराड यांनी दिलेल्या माहितीनुसार, येथील आठवडी बाजार तसेच खासगी ठिकाणी मका खरेदी करताना काही व्यापारी प्रति क्विंटल मागे एक किलो ‘काटा मार’ करत आहेत. म्हणजेच 100 किलो मका देताना 101 किलो वजन मोजले जात असल्याने शेतकऱ्यांचे थेट नुकसान होत आहे.
याशिवाय, “मक्यात मॉइश्चर जास्त आहे” असे कारण सांगून व्यापारी बाजारभावापेक्षा 100 ते 200 रुपये प्रति क्विंटलने कमी दर देत आहेत. शेतकऱ्यांकडे मॉइश्चर मोजण्याची साधने नसल्यामुळे व्यापाऱ्यांनी सांगितलेला दर व वजन त्यांना मान्य करावे लागत आहे.
“वर्षभर कष्ट करून, कर्ज काढून पिकवलेला मका अशा पद्धतीने व्यापाऱ्यांकडून लुबाडला जात आहे. त्यामुळे शेतकरी हतबल झाला असून प्रशासनाने तातडीने कारवाई करून न्याय द्यावा,” असे कृष्णा बेराड यांनी सांगितले.
दरम्यान, शेतकऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीकडे तक्रार देत पिंपळगाव रेणुकाई येथे पथक पाठवून वजन काटे व मॉइश्चर मीटरची तपासणी करण्याची मागणी केली आहे. दोषी व्यापाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.
























