आठवडे बाजार परिसरात आधुनिक पोलिस चौकी उभारणीला सुरुवात : प्रजासत्ताक दिनी पाचोऱ्यास सुरक्षेची मोठी भेट
पाचोरा | प्रतिनिधी
प्रजासत्ताक दिनाच्या पावन पर्वावर पाचोरा शहराच्या सुरक्षाव्यवस्थेला अधिक सक्षम करणारी, दीर्घकालीन दृष्टीकोनातून अत्यंत महत्त्वाची अशी पायाभरणी करण्यात आली. शहरातील सर्वाधिक वर्दळीच्या आणि संवेदनशील असलेल्या आठवडे बाजार परिसरात नव्या जागेवर उभारण्यात येणाऱ्या आधुनिक व सुसज्ज पोलिस चौकीच्या इमारतीचे भूमिपूजन मोठ्या उत्साहात संपन्न झाले. हा उपक्रम म्हणजे पाचोऱ्याच्या कायदा-सुव्यवस्थेसाठी मिळालेली एक ठोस व विश्वासार्ह भेट ठरली आहे.
आठवडे बाजार परिसरात यापूर्वी पोलिस चौकी कार्यरत होती; मात्र ती जागेच्या मर्यादा, वाढती लोकसंख्या, व्यापारी हालचाली आणि बाजारातील वाढलेली वर्दळ लक्षात घेता अपुरी ठरत होती. या पार्श्वभूमीवर जुन्या चौकीच्या जागेऐवजी आता अधिक मोक्याच्या आणि सोयीस्कर ठिकाणी आधुनिक सुविधा, प्रशस्त जागा आणि प्रभावी कार्यक्षमतेची पोलिस चौकी उभारण्यात येत आहे. यामुळे केवळ गुन्हे नियंत्रणच नव्हे तर नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना अधिक दृढ होण्यास मदत होणार आहे.
या भूमिपूजन सोहळ्यास भडगाव–पाचोरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा. किशोर आप्पा पाटील, पाचोरा नगरपालिकेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा मा. सौ. सुनिताताई किशोर पाटील, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मा. श्री. मंगेश देवरे, उपविभागीय पोलिस अधिकारी मा. श्री. बापू रोहम, पोलिस निरीक्षक मा. श्री. राहुलकुमार पवार, पोलिस उपनिरीक्षक श्री. योगेश गणगे, श्री. सुनील पाटील यांच्यासह नवनिर्वाचित नगरसेवक-नगरसेविका, पदाधिकारी, प्रशासनातील अधिकारी-कर्मचारी, पत्रकार बांधव व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी नगराध्यक्षा सौ. सुनिताताई पाटील, मुख्याधिकारी श्री. मंगेश देवरे, उपविभागीय पोलिस अधिकारी श्री. बापू रोहम, पोलिस निरीक्षक श्री. राहुलकुमार पवार तसेच श्री. रवीशेठ केसवानी यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. सर्व मान्यवरांच्या व उपस्थित ज्येष्ठ पत्रकार सी. एन. चौधरी सर यांच्या सर्वांच्या हस्ते भूमिपूजनाचा नारळ फोडून या इमारतीच्या उभारणीस औपचारिक सुरुवात करण्यात आली.
या प्रसंगी आमदार किशोर आप्पा पाटील यांनी सांगितले की, “आठवडे बाजार परिसरातील जुनी पोलिस चौकी बाजूच्या जागेत कार्यरत होती. आता नव्या जागेवर अधिक सुविधा असलेली, आधुनिक पोलिस चौकी उभारली जाणार असून ही इमारत सात ते आठ महिने अथवा जास्तीत जास्त एका वर्षाच्या कालावधीत पूर्ण करून नागरिकांच्या सेवेत दाखल करण्यात येईल.”
वाढती लोकवर्दळ, व्यापारी घडामोडी, सामाजिक सलोखा आणि संवेदनशीलतेच्या दृष्टीने ही पोलिस चौकी पाचोरा शहरासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. कायदा-सुव्यवस्था अधिक सक्षम होऊन बाजारपेठ, व्यापारी, महिला व सर्वसामान्य नागरिकांना सुरक्षिततेचा ठोस दिलासा मिळेल, असा विश्वास या निमित्ताने व्यक्त करण्यात येत आहे.
























