दिव्यांग महिला उमेदवाराला नामनिर्देशनासाठी करावी लागली तारेवरची कसरत निवडणूक विभागाच्या नियोजनाचा अभाव उघड
दत्तात्रय काटोले सोयगाव
सोयगाव, दि. २२ :
जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीसाठी सुरू असलेल्या नामनिर्देशन प्रक्रियेदरम्यान निवडणूक कार्यालयातील अस्वच्छता व अपुऱ्या नियोजनाचा प्रकार बुधवारी उघडकीस आला. कार्यालय परिसरात साचलेली धूळ, तसेच प्रवेशद्वाराजवळ टाकलेला पण न पसरवलेला मुरुम यामुळे महिला उमेदवारांना मोठा त्रास सहन करावा लागला. विशेषतः बहुजन समाज पक्षाच्या आमखेडा गटातील दिव्यांग महिला उमेदवार उर्मिला संदीप इंगळे यांना नामनिर्देशन पत्र दाखल करताना अक्षरशः तारेवरची कसरत करावी लागली.
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागेवर उभारण्यात आलेल्या प्रशासकीय इमारतीत निवडणूक कार्यालय सुरू आहे. मात्र या इमारतीत मोठ्या प्रमाणात धूळ साचलेली असून अद्याप साफसफाई करण्यात आलेली नाही. अशा अस्वच्छ परिस्थितीत निवडणूक प्रक्रिया राबवली जात असल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
दी. २१ बुधवार हा नामनिर्देशन पत्र दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने तीन गट व सहा गणांसाठी उमेदवारांची मोठी गर्दी कार्यालयात झाली होती. उमेदवारांची ये-जा सुलभ व्हावी म्हणून कार्यालयाच्या गेटजवळ मुरुम टाकण्यात आला होता. मात्र तो मुरुम पसरवण्यात न आल्याने प्रवेश करताना विशेषतः महिला व दिव्यांग उमेदवारांना मोठा त्रास सहन करावा लागला.दिव्यांग उमेदवारांसाठी कोणतीही विशेष व्यवस्था किंवा सोयी-सुविधा उपलब्ध करून न दिल्यामुळे उपस्थित उमेदवार व नागरिकांनी निवडणूक विभागाच्या नियोजनावर तीव्र प्रश्न उपस्थित केले. कार्यालयातील धूळ व अस्ताव्यस्त परिसरामुळे पाय घसरून अपघात होण्याचीही शक्यता असून, तरीही प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप होत आहे.
निवडणूक विभाग वेळेत साफसफाई करून आवश्यक सुविधा उपलब्ध करणार का, याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.
फोटो दत्तात्रय काटोले.

























