Home महाराष्ट्र कंकराळा येथे मालवाहतूक वाहन विहिरीत कोसळले; सुदैवाने जीवितहानी टळली

कंकराळा येथे मालवाहतूक वाहन विहिरीत कोसळले; सुदैवाने जीवितहानी टळली

कंकराळा येथे मालवाहतूक वाहन विहिरीत कोसळले; सुदैवाने जीवितहानी टळली

 

 

दत्तात्रय काटोले, सोयगाव | दि. ५

सोयगाव तालुक्यातील कंकराळा गावाजवळ रविवारी दुपारी एक ते दोन वाजेच्या सुमारास मालवाहतूक करणारे छोटा हत्ती पिकअप वाहन रस्त्यालगत असलेल्या विहिरीत कोसळल्याची धक्कादायक घटना घडली. सुदैवाने वाहनात कोणीही नसल्याने जीवितहानी टळली, मात्र सुमारे १० क्विंटल गव्हाचे नुकसान झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित वाहन गहू वाहतुकीसाठी रस्त्याच्या कडेला उभे करण्यात आले होते. चालक काही वेळासाठी दूर गेला असताना अज्ञात व्यक्तीने वाहनाची चावी फिरवून ते सुरू केले. त्यानंतर वाहन उतारावरून पुढे सरकत खड्ड्यात आदळले आणि थेट सुमारे ४५ फूट खोल विहिरीत कोसळले. विहिरीत सुमारे ४० फूट पाणी असल्याने वाहन बाहेर काढणे मोठे आव्हान ठरले.

घटनेचा मोठा आवाज ऐकून ग्रामस्थांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. वाहनात कोणी अडकले आहे का, याची खात्री करण्यासाठी ग्रामस्थांनी प्रयत्न केले. त्यानंतर क्रेनच्या सहाय्याने दीड ते दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर वाहन विहिरीतून बाहेर काढण्यात आले. यासाठी जीवन उबाळे यांच्यासह ग्रामस्थांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

दरम्यान, या घटनेमुळे रस्त्यालगत असलेल्या विहिरींना कठडे नसल्याचा गंभीर प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. संबंधित विहीर ग्रामपंचायतीमार्फत काही वर्षांपूर्वी खोदण्यात आली होती, मात्र सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत, अशी ग्रामस्थांची तक्रार आहे. या प्रकरणाची चौकशी करून जबाबदारांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

या घटनेमुळे प्रशासनाच्या निष्काळजीपणावरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होत आहे.

Don`t copy text!