महानगरपालिका प्रशासनाची जय्यत तयारी; ५१६ केंद्रांवर होणार मतदान, आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांची माहिती.
महापालिका निवडणुकीची रणधुमाळी: उद्या साहित्य वाटप, गुरुवारी मतदान आणि शुक्रवारी गुलाल!
( जळगाव शहर प्रतिनिधी मकरंद कुळकर्णी ) महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज झाले असून, उद्यापासून निवडणूक साहित्याचे वाटप केले जाणार आहे. गुरुवारी (१५ जानेवारी) मतदान होणार असून शुक्रवारी (१६ जानेवारी) दुपारी २ वाजेपर्यंत निकालाचे चित्र स्पष्ट होईल, अशी माहिती महापालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी उपायुक्त निर्मला गायकवाड-पेखळे, शोभा बाविस्कर आणि सहा निवडणूक निर्णय अधिकारी उपस्थित होते.
मतदान प्रक्रियेचे नियोजन: एका नजरेत
निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासनाने मोठा फौजफाटा तैनात केला आहे:
मतदान केंद्रे: एकूण ५१६ केंद्रे.
विशेष केंद्रे: १ पिंक बूथ (महिला संचलित), २ दिव्यांग केंद्र आणि १२ आदर्श मतदान केंद्रे.
मनुष्यबळ: ३,५५५ कर्मचाऱ्यांचा स्टाफ, ज्यात २०० महिला कर्मचारी आणि ५२ क्षेत्रीय अधिकारी आहेत.
सुरक्षा: ५१६ पोलीस कर्मचारी तैनात.
प्रशिक्षण: ७२ मास्टर ट्रेनरद्वारे कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण पूर्ण.
वेळापत्रक आणि मतदान प्रक्रिया
उद्या एमआयडीसी येथील वखार महामंडळ १४ व १७ येथून निवडणूक साहित्याचे वाटप करण्यात येईल.
१५ जानेवारी (गुरुवार): सकाळी ६:०० वाजता ‘मॉक पोल’ होईल. सकाळी ७:०० वाजता प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात होईल.
वेळ मर्यादा: सायंकाळी ५:३० वाजता मतदान बंद होईल. मात्र, साहित्याच्या वेळी जे मतदार रांगेत असतील, त्यांनाच मतदानाचा हक्क बजावता येईल.
सुरक्षितता: मतदानानंतर सर्व यंत्रे सीलबंद करून वखार महामंडळातील स्ट्रॉंग रूममध्ये ठेवण्यात येतील.
मतमोजणी आणि निकाल (१६ जानेवारी)
शुक्रवारी सकाळी १०:०० वाजता मतमोजणीला सुरुवात होईल. यासाठी एकूण १४ टेबल लावण्यात आले आहेत.
पद्धत: सर्वात आधी टपाली मतपत्रिकांची मोजणी होईल, त्यानंतर ईव्हीएम (EVM) मशीनमधील मोजणी सुरू होईल.
निकाल: दुपारी २:०० वाजेपर्यंत सर्व निकाल हाती येण्याची शक्यता आहे. विजयी उमेदवारांना जागीच प्रमाणपत्र दिले जाईल. जे उमेदवार गैरहजर असतील, त्यांना महापालिकेतून प्रमाणपत्र घ्यावे लागेल.
असे असेल मतमोजणीचे विभागवार नियोजन:
महानगरपालिका प्रशासनाने मतमोजणीसाठी सहा विभागांमध्ये विभागणी केली असून एकूण १४ टेबलवर ही प्रक्रिया पार पडणार आहे.
पहिल्या विभागात प्रभाग क्रमांक १, २ आणि ३ ची मतमोजणी होणार असून प्रत्येकी ६ राऊंड होतील. दुसऱ्या विभागात प्रभाग क्रमांक ४ चे ६ राऊंड, तर प्रभाग ५ आणि ६ चे प्रत्येकी ७ राऊंड होतील. तिसऱ्या विभागात प्रभाग ७ चे ६ राऊंड, तर प्रभाग ११ आणि १२ चे प्रत्येकी ७ राऊंड नियोजित आहेत.
चौथ्या विभागाच्या नियोजनानुसार प्रभाग १३ चे ७ राऊंड होतील, तर प्रभाग १४, १८ आणि १९ चे प्रत्येकी ५ राऊंड पार पडणार आहेत. पाचव्या विभागात प्रभाग १५, १६ आणि १७ या तिन्ही प्रभागांचे प्रत्येकी ६ राऊंड संपन्न होतील. सहाव्या विभागात प्रभाग ८ चे ८ राऊंड, प्रभाग ९ चे ९ राऊंड आणि प्रभाग १० चे एकूण ७ राऊंड होणार आहेत. ही सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी अधिकृत निकाल जाहीर करतील.















