वरखेडी नाक्याजवळ मजुरास चारचाकी वाहनाने चिरडले

वरखेडी नाक्याजवळ मजुरास चारचाकी वाहनाने चिरडले

प्रतिनिधी / पाचोरा
पाचोरा येथील वरखेडी नाक्याजवळ सायकलवरुन वर्धामान दाल मिल येथे कामावर जात असतांना समोरुन भरधाव वेगाने येणाऱ्या टाटा (योध्दा) या चारचाकी वाहनाने जोरदार धडक दिल्याने ड्रायव्हर साईडच्या पुढील चाकाखाली चिरडून ४५ वर्षीय मजुर जागेवर ठार झाला. घटनेप्रकरणी पाचोरा पोलिसात अपघाताचा गुन्हा नोंदविण्यात आला असून वाहन चालकास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, पाचोरा शहरातील सिंदी काॅलनी जवळील श्रीकृष्ण नगर भागात रहिवाशी असलेल्या रमेश राजाराम हटकर (वय – ४५) हा मजुर मोंढाळे रोडवरील वर्धमान दाल मिल मध्ये मजुरी करत असुन गुरुवारी दुपारी १ वाजेच्या दरम्यान जेवणासाठी घरी आल्यानंतर दुपारी २ वाजुन ३० मिनिटांनी कामावर परत जात असतांना समोरुन चाकण (पुणे) येथुन एका मागे एक विना पासिंग असलेल्या टाटा (योध्दा) ही चार वाहने गोरखपूर (उत्तर प्रदेश) येथे जात असतांना त्यातील अनिल सुर्यकांत बर्डे मु. पो. पिंप्री निर्मळ, ता. राहता, जि. अहमदनगर या चालकाच्या वाहनाने रमेश हटकर यांना जोरदार धडक दिल्याने ते खाली पडुन पुढच्या चाका खाली दाबला गेला. त्यांचे डोक्याला जबर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. मयताचे शवविच्छेदन पाचोरा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमित साळुंखे यांनी केले. मयताचे पाश्चात्य वृद्ध आई, पत्नी, एक मुलगा, तीन लहान मुली असा परिवार असुन मृताच्या नातेवाईकांचा पोलिस स्टेशनसमोर मोठा जमाव जमला होता. वृद्ध आई व चार मुलांचा एकुलता एक कमवता मुलगा आणि वडील गमावल्याने आई व पत्नीने एकच आक्रोश केला होता.