Home पाचोरा जिल्ह्यात काँग्रेस वाढवण्यासाठी मुंबई येथे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ व नवनियुक्त जिल्हाध्यक्ष...

जिल्ह्यात काँग्रेस वाढवण्यासाठी मुंबई येथे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ व नवनियुक्त जिल्हाध्यक्ष ॲड अविनाश भालेराव यांची बैठक 

जिल्ह्यात काँग्रेस वाढवण्यासाठी मुंबई येथे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ व नवनियुक्त जिल्हाध्यक्ष ॲड अविनाश भालेराव यांची बैठक

 

जळगाव : आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक मजबुती, कार्यकर्त्यांचे जाळे विस्तारण्याची दिशा आणि विजयासाठी प्रभावी रणनीती निश्चित करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या टिळक भवन, मुंबई येथील मुख्यालयात जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीची महत्त्वपूर्ण आढावा बैठक उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. या बैठकीला प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्ह्यातील काँग्रेस संघटनेच्या सद्यस्थितीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. बैठकीत जळगाव जिल्ह्यात काँग्रेस पक्षाचे संघटन अधिक सक्षम करण्यासाठी विविध स्तरांवर व्यापक चर्चा झाली. ग्रामीण भागातील बूथस्तरापासून ते तालुका आणि जिल्हा स्तरावरील संघटनात्मक रचनेला अधिक गतिमान करण्याची गरज व्यक्त करण्यात आली. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाला भक्कम यश मिळवून देण्यासाठी कार्यकर्त्यांना एकसंघ ठेवणे, नव्या नेतृत्वाला संधी देणे आणि सर्व घटकांना सोबत घेऊन पक्ष विस्ताराचे धोरण राबविण्यावर विशेष भर देण्यात आला. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मार्गदर्शन करताना संघटन हीच पक्षाची खरी ताकद असल्याचे स्पष्ट केले. आगामी निवडणुका केवळ राजकीय स्पर्धा नसून जनतेच्या विश्वासाची परीक्षा असल्याचे सांगत त्यांनी प्रत्येक कार्यकर्त्याने गावागावात पोहोचून पक्षाची विचारधारा आणि जनहिताच्या भूमिका प्रभावीपणे मांडण्याचे आवाहन केले. जळगाव जिल्ह्यात काँग्रेसची परंपरा आणि जनाधार अधिक मजबूत करण्यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने काम करण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली. बैठकीत जळगाव जिल्ह्याच्या पूर्व आणि पश्चिम विभागातील नूतन जिल्हाध्यक्षांनी पुढील पंधरा दिवसांच्या आत संपूर्ण जिल्ह्याचा व्यापक दौरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. या दौऱ्यादरम्यान सर्व तालुके, शहर आणि ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांशी संवाद साधून संघटनात्मक स्थिती जाणून घेतली जाणार आहे. त्यानंतर सर्व समाजघटक, युवा, महिला, शेतकरी, कामगार आणि अनुभवी कार्यकर्त्यांना प्रतिनिधित्व देणारी सर्वसमावेशक जिल्हा कार्यकारिणी प्रदेश काँग्रेसच्या मान्यतेने जाहीर करण्यात येणार असल्याचे बैठकीत निश्चित करण्यात आले. यावेळी आगामी निवडणुकांसाठी मतदारांशी थेट संपर्क वाढविणे, स्थानिक प्रश्नांवर आक्रमक भूमिका घेणे, गावपातळीवरील पक्ष संघटन सक्रिय करणे तसेच नव्या मतदारांपर्यंत काँग्रेसची भूमिका पोहोचविण्यासाठी स्वतंत्र कृती आराखडा तयार करण्याबाबत चर्चा झाली. जिल्ह्यातील विविध भागांमध्ये पक्षाच्या संघटनात्मक बैठका, प्रशिक्षण शिबिरे आणि जनसंवाद अभियानांचे आयोजन करण्याबाबतही सकारात्मक विचारविनिमय झाला. बैठकीत लवकरच प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा जळगाव जिल्हा दौरा आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. या दौऱ्यात जिल्ह्यातील कार्यकर्त्यांशी प्रत्यक्ष संवाद साधून आगामी राजकीय घडामोडी, निवडणूक तयारी आणि संघटन विस्ताराच्या कार्यक्रमांना गती देण्यात येणार आहे. पक्षातील समन्वय, शिस्त आणि सातत्यपूर्ण जनसंपर्क यांनाच आगामी यशाची गुरुकिल्ली मानण्यात आले. या बैठकीला प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष एडवोकेट गणेश पाटील, प्रदेश उपाध्यक्ष एडवोकेट संदीप भैय्या पाटील, माजी मंत्री रमेश बागवे, प्रदेश सचिव प्रवीण सुरवाडे, जिल्हा काँग्रेस अध्यक्ष एडवोकेट अविनाश भालेराव, पूर्वचे जिल्हाध्यक्ष धनंजय चौधरी, नितीन सूर्यवंशी, एडवोकेट अंकुश कटारे, नगरसेवक अहमद कुरेशी आदी पदाधिकारी उपस्थित होते. सर्वांनी एकमुखाने संघटन विस्तार, कार्यकर्त्यांचे सक्षमीकरण आणि आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये काँग्रेसचा झेंडा अधिक उंचावण्यासाठी एकजुटीने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. मुंबईतील या आढावा बैठकीमुळे जळगाव जिल्ह्यातील काँग्रेस संघटनेला नव्या दिशेचे मार्गदर्शन मिळाले असून, आगामी निवडणुकांच्या दृष्टीने पक्षाने विजयाचा स्पष्ट आराखडा तयार करण्यास सुरुवात केल्याचे चित्र दिसून आले.

Don`t copy text!