Home पाचोरा पाचोरा येथे अनोख्या पद्धतीने शिवविवाह सोहळा संपन्न; विवाह पीठाचे विचारपीठात रूपांतर

पाचोरा येथे अनोख्या पद्धतीने शिवविवाह सोहळा संपन्न; विवाह पीठाचे विचारपीठात रूपांतर

पाचोरा येथे अनोख्या पद्धतीने शिवविवाह सोहळा संपन्न; विवाह पीठाचे विचारपीठात रूपांतर

 

पाचोरा : पाचोरा-डोंगरगाव येथील सर्वांना सुपरिचित असलेले शिवश्री रामदास महादू पाटील यांची कन्या शिवमती जयश्री आणि मुक्काम पोस्ट दोनघर, ता. शहापूर, जि. ठाणे येथील शिवश्री यादव गोविंद देसले यांचे चिरंजीव श्री. माधव यांचा शिवविवाह समर्थ लॉन्स, पाचोरा येथे नुकताच अत्यंत वेगळ्या आणि वैचारिक पद्धतीने संपन्न झाला.
या विवाह सोहळ्यास विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून नवदांपत्यास शुभेच्छा दिल्या. यामध्ये माजी कुलगुरू उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव डॉ. अण्णासाहेब के. बी. पाटील, प्रति इतिहासकार शिवश्री इंजिनिअर चंद्रशेखर शिखरे (छत्रपती संभाजीनगर), रामदादा पवार (जळगाव), सतीश बापू शिंदे (गिरणाई पतसंस्थेचे चेअरमन), माजी आमदार दिलीप भाऊ वाघ, ॲड. अविनाश भाऊ भालेराव (जिल्हाध्यक्ष ग्रामीण काँग्रेस), लीना ताई राम पवार (जिजाऊ ब्रिगेड जिल्हाध्यक्ष), सुरेश पाटील, करिम सालार (अल्पसंख्यांक अध्यक्ष), कैलास महाजन (माळी महासंघ अध्यक्ष पाचोरा), सुरेंद्र पाटील, चंद्रकांत ठाकरे (जिल्हाध्यक्ष मराठा सेवा संघ), सुधीर आबा पाटील, वंदनाताई चौधरी (प्रदेश सरचिटणीस महिला राष्ट्रवादी काँग्रेस), पवार सर, सुनिल पाटील, रविंद्र पाटील, राजेंद्र पाटील, राहुल बोरसे, दीपक हरी पाटील, डॉ. अनिल दादा देशमुख, खलील दादा देशमुख, प्राचार्य वले सर, किशोर डोंगरे, प्रतिभाताई पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी शिवश्री इंजिनिअर चंद्रशेखर शिखरे यांनी शिवविवाहाचे वेगळेपण स्पष्ट करताना सांगितले की, “आपण कृषी संस्कृतीचे पाईक आहोत. त्यामुळे अन्नधान्याची नासाडी आपल्या संस्कृतीत बसत नाही. एका बाजूला कुपोषणामुळे हजारो लोक मृत्युमुखी पडत असताना अक्षतांच्या स्वरूपात लाखो टन धान्य पायदळी तुडवणे योग्य नाही. त्यामुळे अक्षतांऐवजी टाळ्यांच्या कडकडाटात व फुलांच्या वर्षावातून वधू-वरांना शुभेच्छा द्याव्यात.”
शिवविवाहाबाबत समाजामध्ये अनेक प्रश्न उपस्थित होत असतात. ब्राह्मण किंवा भटजी नाहीत, अक्षता नाहीत, आंतरपट नाही, मंगलाष्टके नाहीत, बँड-बाजा, डॉल्बी, फुगवे आणि वरमंडळींचे पारंपरिक दिखावेही नाहीत. मग नेमके या शिवविवाहात वेगळे काय? या प्रश्नांचे उत्तर या विवाह सोहळ्यातून उपस्थितांना अनुभवायला मिळाले. विवाह पीठाचे रूपांतर चक्क विचारपीठात झाले होते.
शिव संस्कृतीनुसार विवाह विधीमध्ये स्त्री-पुरुष समानतेला महत्त्व देण्यात आले. शिवसंस्कृतीवर वैदिक संस्कृतीचे आक्रमण झाल्यानंतर स्त्रियांचे अनेक अधिकार हिरावले गेल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
जयश्री-माधव यांच्या शिवविवाहात अमळनेर येथील शिवमती वसुंधरा लांडगे यांनी शिवपंचकासह संपूर्ण शिवधर्म विधी पार पाडले. तसेच विवाहानंतर कडवत्रे पाटील व देसले पाटील परिवाराच्या वतीने उपस्थित प्रत्येकाला “प्रति इतिहास” ही पुस्तिका भेट स्वरूपात देण्यात आली.
या विवाह सोहळ्यात उभारण्यात आलेले प्रवेशद्वार, मंडप आणि स्टेजची सजावटही विशेष आकर्षण ठरली. लग्न मंडपात विविध पुस्तकांचे स्टॉल उभारण्यात आले होते. मोठ्या प्रमाणावर पुस्तकांची विक्री झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
अनोख्या परंपरा, वैचारिक भूमिका आणि सामाजिक संदेश देणारा हा शिवविवाह उपस्थितांसाठी एक संस्मरणीय आणि प्रेरणादायी सोहळा ठरला.

Don`t copy text!