नांद्रा जिल्हा परिषद शाळेची ‘BTS’ परीक्षेत बाजी; शर्विल जोशी जिल्हा गुणवत्ता यादीत तिसरा
पाचोरा (प्रतिनिधी): भारत टॅलेंट सर्च (BTS) या मानाच्या स्पर्धा परीक्षेत पाचोरा तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा नांद्रा येथील विद्यार्थ्यांनी दैदिप्यमान यश संपादन केले आहे. शाळेचा निकाल १०० टक्के लागला असून, इयत्ता पहिलीचा विद्यार्थी शर्विल सचिन जोशी याने १२२ गुण मिळवून जिल्हा गुणवत्ता यादीत तिसरा क्रमांक पटकावला आहे.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या यशाने परिसरात शाळेचे कौतुक होत आहे. या परीक्षेत इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. शर्विलने मिळवलेले हे यश त्याच्या कष्टाचे आणि शिक्षकांच्या योग्य मार्गदर्शनाचे फळ मानले जात आहे.
*शर्विलचे ‘पहिली’तच मोठे यश:*
स्पर्धा परीक्षेचे गांभीर्य लहान वयातच ओळखून शर्विलने अत्यंत कठीण समजल्या जाणाऱ्या ‘BTS’ परीक्षेत १२२ गुण मिळवले. ग्रामीण भागातील सुविधांच्या मर्यादा ओलांडून त्याने जिल्हा स्तरावर मिळवलेले हे यश कौतुकास्पद मानले जात आहे. त्याच्या या अनोख्या यशाने नांद्रा गावाच्या नावलौकिकात भर पडली आहे.
*शिक्षकांचे अतिरिक्त परिश्रम:*
या यशामागे शाळेतील शिक्षकांचे मोठे योगदान आहे. इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षकांनी नियमित ‘अतिरिक्त तास’ घेऊन मार्गदर्शन केले. वरिष्ठ मुख्याध्यापक श्री. राजेंद्र गोसावी, श्रीमती वंदना माळी, श्री. ईश्वर सोळंके, श्री. विनोद चव्हाण, श्री. सचिन जोशी आणि सौ. विद्या जोशी यांनी विद्यार्थ्यांच्या तयारीसाठी विशेष मेहनत घेतली. शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री बापू सातपुते तसेच सर्व सदस्य. ग्रामपंचायत नांद्रा यांच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले.






















