चोपडा येथील दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात ‘वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ’ उत्साहात संपन्न
चोपडा:येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात ‘वार्षिक पारितोषिक वितरण समारंभाचे’ आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाची सुरुवात माजी शिक्षणमंत्री कै. ना.अक्कासो सौ. शरच्चंद्रिका सुरेश पाटील व संस्थापक अध्यक्ष कै. ना. दादासाहेब सुरेश जी. पाटील यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते माल्यार्पण करून करण्यात आली. या कार्यक्रमाला महात्मा गांधी शिक्षण मंडळाच्या सचिव डॉ.सौ. स्मिताताई संदीप पाटील यांनी शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष ॲड. संदीप सुरेश पाटील हे उपस्थित होते. तसेच या कार्यक्रमासाठी उदघाटक म्हणून चोपडा नगरपालिकेचे मुख्याधिकारी राजनिवास झंवर, प्रमुख अतिथी म्हणून चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक महेश टाक, चोपडा नगर परिषदेचे नगरसेवक अमोल पाटील, चोपडा नगर परिषदेच्या नगरसेविका सौ. वंदना पाटील तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. के. एन. सोनवणे, उपप्राचार्य प्रा.डॉ.आर. एम. बागुल, उपप्राचार्य प्रा. डॉ.ए. बी. सूर्यवंशी, समन्वयक डॉ. एस. ए. वाघ, कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य पी. एस. पाडवी, पर्यवेक्षक ए. एन. बोरसे, महाविद्यालयाचे रजिस्ट्रार डी. एम. पाटील आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डॉ.के.एन. सोनवणे यांनी केले तर अहवाल वाचन पारितोषिक वितरण समिती प्रमुख डॉ.व्ही. आर. कांबळे व आर. ई. लांडगे यांनी केले. यावेळी त्यांनी आपल्या अहवालात वाचनात महाविद्यालयात घेण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमाविषयी, महाविद्यालयातील विविध सोयी सुविधांविषयी, महाविद्यालयात चालवले जाणारे विविध उपक्रम जसे की मेंटर-मेंटी उपक्रम, केक-फ्री कॅम्पस, शुद्ध पिण्याच्या पाण्याचा प्रकल्प, वाचन संस्कृती अभियान महाविद्यालयाच्या यशाच्या शिखरावरचा चढता आलेख आपल्या अहवाल स्वरूपात सादर केला.
या कार्यक्रमाप्रसंगी उदघाटक व नगरपालिकेचे मुख्याधिकारी आपले उदघाटनपर मनोगत व्यक्त करतांना म्हणाले की, ‘विद्यार्थ्यांना जिद्द, चिकाटी, धडपड, योग्य नियोजन, कष्ट करण्याची तयारी यांच्या जोरावर यश संपादन करता येते. विद्यार्थ्यांनी छोटया कामातून प्रेरणा घेऊन अभ्यासात सातत्य ठेवावे व कामात झोकून द्यावे’. यावेळी त्यांनी महाविद्यालयाचा परिसर व यशस्वी कामगिरीचे त्यांनी कौतुक केले तसेच अधिकारी पदावर काम करतांना आलेले अनुभव, कष्ट, केलेला संघर्ष यांचे कथन करून समाजातील विविध क्षेत्रात अग्रेसर असलेल्या व्यक्तींचे उदाहरण देऊन प्रोत्साहित केले व यशवंत विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांनी शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाप्रसंगी सन 2025-26 या शैक्षणिक वर्षातील विविध खेळ, क्रीडा, कलागुण, राष्ट्रीय सेवा योजना, एनसीसी विभाग व संपूर्ण शैक्षणिक वर्षात विशेष प्राविण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र व रोख रक्कम बक्षीस देऊन जवळपास 70 हून अधिक विद्यार्थ्यांना मान्यवरांचा हस्ते गौरविण्यात करण्यात आले. सदर पारितोषिके अथवा पुरस्कार देणगीदारांनी दिलेल्या ठेवीच्या व्याजातून कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयात प्रथम क्रमांक प्राप्त करणाऱ्या तसेच विद्यापीठ गुणवत्ता यादीत येणाऱ्या विद्यार्थ्यांना दिला जातो.
या कार्यक्रमाचे अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना संस्थेचे अध्यक्ष ऍड. संदीप सुरेश पाटील म्हणाले की, ‘परीक्षा हे तंत्र आहे. ते आत्मसात करण्यासाठी अभ्यास, जिद्द व चिकाटी हे गुण विद्यार्थ्यांच्या अंगी असणे आवश्यक आहे. भविष्यात विद्यार्थ्यांना अनेक संधी उपलब्ध आहेत. त्याचा फायदा विद्यार्थ्यांनी घ्यायला हवा. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी प्रयत्नात सातत्य व दूरदृष्टी ठेवून ध्येयाकडे मार्गक्रमण करावे’.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्रीमती एस.बी.पाटील, व्ही. डी. शिंदे व आर. एन. पाटील यांनी केले तर डॉ. सौ. के. एस. क्षीरसागर यांनी उपस्थित मान्यवर, देणगीदार व ठेवीदार यांचे आभार मानले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विविध समिती प्रमुख व सदस्य यांनी तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व कर्मचारी बंधू -भगिनी यांनी सहकार्य केले.
या कार्यक्रमाप्रसंगी बहुसंख्य विद्यार्थी, पालक, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी बंधू भगिनी उपस्थित होते.

















