महाराष्ट्र राज्य युवा शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या नेतृत्वाखाली शिक्षण आयुक्त कार्यालय, पुणे येथे बेमुदत आमरण उपोषण सुरू

पुणे, दि. २६ जुलै : महाराष्ट्र राज्य युवा शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या नेतृत्वाखाली राज्यातील शारीरिक शिक्षण शिक्षक भरतीच्या प्रलंबित प्रश्नांसंदर्भात शिक्षण आयुक्त कार्यालय, पुणे येथे दि. २४ जुलै २०२६ (शुक्रवार) पासून शांततापूर्ण बेमुदत आमरण उपोषण सुरू असून, राज्यभरातील बी.पी.एड., एम.पी.एड. व TAIT-2025 पात्र शारीरिक शिक्षण शिक्षकांनी आंदोलनाला उत्स्फूर्त पाठिंबा दिला आहे.
शालेय शिक्षण व्यवस्थेमध्ये शारीरिक शिक्षण हा विद्यार्थ्यांच्या शारीरिक, मानसिक, बौद्धिक व सर्वांगीण विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. सक्षम समाज व बलशाली राष्ट्रनिर्मितीसाठी तसेच आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडविण्यासाठी शारीरिक शिक्षण विषयाची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. मात्र, गेल्या जवळपास २० वर्षांपासून शारीरिक शिक्षण शिक्षकांच्या पदभरतीकडे सातत्याने दुर्लक्ष झाल्याने हजारो बी.पी.एड., एम.पी.एड. व TAIT पात्र उमेदवार बेरोजगार आहेत.
यापूर्वी महाराष्ट्र राज्य युवा शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या वतीने दि. २७ एप्रिल २०२६ व दि. ०८ जुलै २०२६ रोजी मुंबई येथील आझाद मैदानावर आंदोलने करण्यात आली होती. त्या वेळी शासनाकडून विशेष शिक्षक (क्रीडा) पदांची सेवा शर्ती जाहीर करून भरती प्रक्रिया सुरू करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने महासंघाच्या नेतृत्वाखाली आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे.
आमरण उपोषणात सहभागी उपोषणकर्ते :
– श्री. नागेश पाटील – पंढरपूर
– श्री. सुमित बंडलकर – सातारा
– श्री. शुभम ताठे – अहिल्यानगर
– सौ. प्राजक्ता जोशी – छत्रपती संभाजीनगर
प्रमुख मागण्या
1. विशेष शिक्षक (क्रीडा) पदांची सेवा प्रवेश नियमावली व सेवा शर्ती तात्काळ प्रसिद्ध करून भरती प्रक्रिया सुरू करावी.
2. शासन निर्णय दि. ०२ जानेवारी २०२६ नुसार मंजूर ४,८६० विशेष शिक्षक (क्रीडा) पदांची १०० टक्के भरती पवित्र पोर्टल (TAIT-2025) च्या पहिल्या टप्प्यात करावी.
3. शासन निर्णय दि. १५ मार्च २०२४ नुसार रिक्त होणाऱ्या शारीरिक शिक्षण शिक्षकांच्या पदांवर इतर विषय शिक्षकांचे समायोजन न करता ती पदे पवित्र पोर्टलमार्फत भरावीत.
4. जिल्हा परिषद केंद्रशाळा, माध्यमिक शाळा, महानगरपालिका, नगरपालिका, शासकीय आश्रमशाळा तसेच समाजकल्याण विभागाच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील सर्व रिक्त शारीरिक शिक्षण (क्रीडा) शिक्षक पदांची भरती पवित्र पोर्टलमार्फत तातडीने करावी.
5. पवित्र पोर्टल (TAIT-2025) भरती प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी.
महासंघाने स्पष्ट केले आहे की, हे आंदोलन पूर्णपणे शांततापूर्ण, लोकशाही मार्गाने व कायद्याचे पालन करून सुरू आहे. शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घेऊन शारीरिक शिक्षण शिक्षकांच्या न्याय्य मागण्या मान्य कराव्यात, अन्यथा मागण्या पूर्ण होईपर्यंत आमरण उपोषण सुरूच राहील.
या आंदोलनास महाराष्ट्र राज्य युवा शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाचे मार्गदर्शक श्री. प्रद्युम्न जोशी, श्री. कैलास माने, श्री. विश्वनाथ पाटोळे, श्री. अमोल जोशी, राज्याध्यक्ष श्री. संदीप मनोरे, राज्य सचिव श्री. तायाप्पा शेंडगे, तसेच राज्य कोअर कमिटी, विभागीय, जिल्हा व तालुका पदाधिकाऱ्यांचे नेतृत्व व मार्गदर्शन लाभत असून राज्यभरातील हजारो शारीरिक शिक्षण शिक्षकांनी आंदोलनाला पाठिंबा दर्शविला आहे. जळगांव जिल्हा मधील बी.पी.एड व एम.पी.एड् TAIT धारक यांनी आंदोलनात सहभागी व्हावे असे आव्हान जळगांव जिल्हा युवा शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाचे जिल्हाध्यक्ष श्री.गणेश वंडोळे यांनी केले आहे
























