दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालय आणि चोपडा तहसील कार्यालय यांच्यात सामंजस्य करार
विद्यार्थ्यांना मिळणार प्रशासकीय कामकाजाचा अनुभव; शासकीय योजना पोहोचवणार तळागाळापर्यंत
चोपडा येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालय आणि चोपडा तहसील कार्यालय यांच्यात नुकताच (दि. ४ मे २०२६) एक महत्त्वपूर्ण सामंजस्य करार (MoU) संपन्न झाला. या करारांतर्गत पदवी आणि पदव्युत्तर स्तरावरील विद्यार्थ्यांच्या माध्यमातून विविध प्रशासकीय व शासकीय योजना ग्रामीण भागातील लोकांपर्यंत पोहोचविण्यास मोठी मदत होणार आहे.
महाविद्यालयातील बहुतांश विद्यार्थी हे ग्रामीण भागातून येत असल्याने त्यांना स्थानिक गरजा आणि समस्यांची उत्तम जाण असते. याचाच विचार करून, विद्यार्थ्यांच्या माध्यमातून तहसील कार्यालयाकडून राबविण्यात येणाऱ्या विविध जनसामान्यांच्या योजनांची माहिती थेट गावागावांत पोहोचविण्याचे उद्दिष्ट या करारामागे आहे. तसेच, या सामंजस्य करारांतर्गत महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना तहसील कार्यालयातील विविध अधिकाऱ्यांच्या व्याख्यानांचा आणि मार्गदर्शनाचा लाभ घेता येणार आहे, ज्यामुळे विद्यार्थ्यांना प्रशासकीय कामकाजाची जवळून ओळख होईल.
या महत्त्वपूर्ण सामंजस्य करारावर महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. संध्या सोनवणे आणि चोपड्याचे तहसीलदार श्री. भाऊसाहेब थोरात यांनी स्वाक्षऱ्या केल्या.
महाविद्यालयाच्या या स्तुत्य उपक्रमाबद्दल संस्थेचे अध्यक्ष ॲड. संदीप पाटील तसेच सचिव डॉ. स्मिता पाटील यांनी प्राचार्या आणि संपूर्ण टीमचे विशेष अभिनंदन केले आहे.
याप्रसंगी महाविद्यालयाचे समन्वयक डॉ. शैलेश वाघ, आयक्यूएसी समन्वयक डॉ. एल. बी. पटले, राज्यशास्त्र विभागप्रमुख डॉ. डी. डी. कर्दपवार आदी मान्यवर उपस्थित होते.

















