Home महाराष्ट्र ऑनलाइन खत विक्रीने शेतकरी विक्रेते हैराण खत खरेदीसाठी तासन्तास प्रतीक्षा; ॲप रद्द...

ऑनलाइन खत विक्रीने शेतकरी विक्रेते हैराण खत खरेदीसाठी तासन्तास प्रतीक्षा; ॲप रद्द करण्याची मागणी, आंदोलनाचा इशारा

ऑनलाइन खत विक्रीने शेतकरी विक्रेते हैराण खत खरेदीसाठी तासन्तास प्रतीक्षा; ॲप रद्द करण्याची मागणी, आंदोलनाचा इशारा

 

 

 

 

सोयगाव, दत्तात्रय काटोले :

खरीप हंगाम तोंडावर असताना शासनाने सुरू केलेल्या ऑनलाइन खत विक्री प्रणालीमुळे सोयगाव तालुक्यातील शेतकरी आणि खत विक्रेते दोघेही हैराण झाले आहेत. तांत्रिक अडचणी, बायोमेट्रिक पडताळणीतील अयशस्वी प्रयत्न, युरिया वाटपावरील निर्बंध आणि मंदावलेली विक्री प्रक्रिया यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून, खत खरेदीसाठी सुरू करण्यात आलेले ॲप तात्काळ रद्द करावे तसेच पीक विम्यातील पूर्वीचे ‘ट्रिगर’ निकष पूर्ववत लागू करावेत, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा शेतकरी बांधवांनी दिला आहे.

यासंदर्भात तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, फार्मर आयडी शोधणे, जमिनीनुसार खताची मर्यादित नोंदणी करणे आणि QR कोडची सक्ती यामुळे सामान्य शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. ग्रामीण भागातील अनेक शेतकऱ्यांकडे स्मार्टफोन नसल्याने तसेच इंटरनेट सुविधा अपुरी असल्याने खत खरेदीची प्रक्रिया अधिकच गुंतागुंतीची बनली आहे.

शासनाच्या निर्देशानुसार सोयगाव तालुका व परिसरात रासायनिक खतांची ऑनलाइन विक्री सुरू करण्यात आली आहे. मात्र अॅप व्यवस्थित कार्यरत नसल्याने खत खरेदीसाठी आलेल्या शेतकऱ्यांना तासन्तास प्रतीक्षा करावी लागत आहे. अनेकदा अंगठ्याची पडताळणी (बायोमेट्रिक) होत नसल्याने व्यवहार रखडत असून शेतकरी संताप व्यक्त करत आहेत.

शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, एका एकरासाठी केवळ एकच गोणी युरिया देण्याची अट घालण्यात आल्याने शेतीच्या गरजा पूर्ण होत नाहीत. त्यामुळे किमान दोन ते तीन गोण्या युरियाचा पुरवठा करावा, अशी मागणी करण्यात येत आहे. तसेच अंगठ्याऐवजी ओटीपीद्वारे पडताळणीची सुविधा उपलब्ध करून देण्याचीही मागणी शेतकरी करीत आहेत.

ऑनलाइन प्रक्रियेमुळे खत वितरणाचा वेग मंदावला असून दुकानदार आणि शेतकरी यांच्यात वाद निर्माण होण्याच्या घटनाही वाढू लागल्या आहेत. शेतकरी कृषी सेवा केंद्राचे संचालक पप्पू काळे यांनी सांगितले की, शासनाच्या निर्बंधांमुळे वेळेवर खत वितरण करणे कठीण झाले आहे. अॅपमधील तांत्रिक अडचणींमुळे शेतकऱ्यांचा रोष विक्रेत्यांवर निघत असून परिस्थिती तणावपूर्ण बनत आहे.

दरम्यान, शेतकरी गोपाल बडगुजर यांनीही ऑनलाइन खत विक्री व्यवस्थेबाबत नाराजी व्यक्त करत शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या अडचणी तातडीने दूर करण्याची मागणी केली आहे.

याशिवाय पीक विमा योजनेतील काही महत्त्वाचे ‘ट्रिगर’ निकष रद्द केल्याने नैसर्गिक आपत्तीत होणाऱ्या नुकसानीची योग्य भरपाई मिळणे कठीण झाल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. हे निकष पूर्ववत लागू करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे.

शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या

अंगठ्याऐवजी ओटीपी पडताळणीची सुविधा सुरू करावी.

ऑनलाइन अॅपमधील तांत्रिक त्रुटी तातडीने दूर कराव्यात.

युरिया वाटपावरील निर्बंध शिथिल करावेत.

ऐन हंगामात खतांचा पुरेसा व वेळेवर पुरवठा सुनिश्चित करावा.

पीक विम्यातील पूर्वीचे ‘ट्रिगर’ निकष पुन्हा लागू करावेत.

मात्र, मागण्यांवर तातडीने सकारात्मक निर्णय न झाल्यास सोयगाव तालुक्यातील शेतकरी तहसील कार्यालयावर तीव्र आंदोलन करतील, असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.

अतिरिक्त युरियाची मागणी करू नये

ऑनलाइन खत विक्रीच्या पायलट प्रकल्पासाठी छत्रपती संभाजीनगर आणि कोल्हापूर जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे. अॅप नवीन असल्याने सुरुवातीला काही तांत्रिक अडचणी येत आहेत. मात्र येत्या दोन -चार दिवसांत व्यवस्था सुरळीत होईल. तसेच कृषी विद्यापीठातील तज्ज्ञांच्या शिफारशीनुसार एका एकरासाठी एक किंवा दोन गोणी युरिया पुरेशी असल्याने शेतकऱ्यांनी अतिरिक्त युरियाची मागणी करू नये, असे आवाहन त्यांनी केले आहे. – भारत कासार , तालुका कृषी अधिकारी सोयगाव.

फोटो. दत्तात्रय काटोले.

Don`t copy text!