पाचोरा, दि. 9 : पाचोरा नगर परिषदेची धडक कारवाई : हनुमानवाडी कोर्ट परिसरातील गटारीवरील अतिक्रमण
हटवले, पावसाळ्यापूर्वी दिलासा
पाचोरा नगर परिषदेने शहरातील हनुमानवाडी भागात कोर्टासमोरील सार्वजनिक जागेतील गटारीवरील अनधिकृत बांधकामावर कारवाई करत सदर परिसर अतिक्रमणमुक्त केला आहे.
प्रत्येक पावसाळ्यात गोसे हायस्कूल ते न्यायालय परिसरात दोन ते अडीच फूट पाणी साचत असल्याने शाळा, न्यायालय परिसर व हनुमानवाडीतील गिरड रस्ता पूर्णपणे जलमय होत असे. त्यामुळे वाहतूक ठप्प होणे व न्यायालयाच्या आवारात पाणी शिरणे या समस्या निर्माण होत होत्या.
मा. न्यायालयाच्या निर्देशानुसार व परिसरात निर्माण होणारी तलावसदृश परिस्थिती लक्षात घेता, मुख्याधिकारी मंगेश देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली गटारीवरील अतिक्रमण हटवण्यात आले. या कारवाईमुळे पावसाळ्यात पाण्याचा निचरा सुरळीत होऊन वाहतूक व न्यायालयीन कामकाजात अडथळा येणार नाही, अशी अपेक्षा आहे.
*पावसाळ्यापूर्व तयारीला वेग*
नगर परिषदेकडून नाले सफाईचे काम अंतिम टप्प्यात असून उर्वरित भागातील कामेही युद्धपातळीवर सुरू आहेत. मुख्याधिकारी स्वतः कर्मचाऱ्यांसह प्रत्यक्ष पाहणी करून कामे पूर्ण करून घेत आहेत. अभियंते, कर्मचारी व कामगार वर्ग पावसाळ्यातील संभाव्य अडचणी लक्षात घेऊन तत्परतेने कार्यरत आहेत.
*नागरिकांना आवाहन
मुख्याधिकारी मंगेश देवरे यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, पाण्याच्या प्रवाहाला अडथळा निर्माण होईल अशा प्रकारचे अनधिकृत बांधकाम किंवा अतिक्रमण करू नये. अन्यथा स्वतःच्याच मालमत्तेचे नुकसान होऊ शकते. अतिक्रमण विभागाचे अधिकारी व आरोग्य विभागाचे कर्मचारी सातत्याने जनजागृती करत असून, अतिक्रमण विभाग प्रमुख भालेराव यांच्या सक्रियतेमुळे अनेक कामांना गती मिळाली आहे. उप.मु. दुर्गेश सोनवणे,बांधकाम विभाग इंजी.भय्यासाहेब पाटील, मराठे साहेब,गोवर साहेब,नकवाल साहेब, तसेच कर्मचारी यांनी चोख कामगीरी बजावली.
नगर परिषदेची ही धडक मोहीम शहरातील इतर भागांतही राबवावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.






















